Friday, 16 September 2022

मनन

जेव्हा जग बंद होतं

तेव्हा उघडते वही

तिच्यावर कोरावयाची चार अक्षरे

आणि वाटलेलं काही


वाटतंय तर खूप काही

पण त्यातलं किती उरणार 

आणि किती उतरणार

याला मात्र नेम नाही


शून्यातल्या शून्यकडचा प्रवास

माझा माझ्यातला

चालू राहिल संपेल

याला काही उत्तर नाही


तरीही पुढे जातोय असं वाटून

आहे तेच करत राहणं

सुरु राहिल

त्याच्यामध्ये खंड नाही


बंड नको म्हणतात विचार सुद्धा आता

शांतता हवी जीवाला

मौनाची लेखणी शोधताना 

सापडेल का काही

Thursday, 7 April 2022

जगत

 कसं कसं मोडक तोडक आयुष्य

त्याला छान छान सजवायचं

गुलाबाचं रोपटं जसं

उन्हा सावलीत फुलवायचं


कधी आपसूक हसू

कधी निराशा अवेळी 

उजव्या डाव्या हाताने 

गुंफावयाची ही खेळी


पुन्हा पुन्हा वाटे

सुख यावे सहज

तोवर एकांतात घालवायच्या

क्षणाची मौज


आहे नाही मग व्हावे घडावे

सत्य आणि कल्पना मोजत

नकळत कुठे तरी आपण 

असतो असेच जगत

Monday, 24 May 2021

"अपूर्ण"

शहारून येते मन 

होतात स्वप्नाभास 

सत्य जाणवता मी 

सावरते स्वतःस 


हरवत जाते वाट 

जेव्हा मनी विचारांत

वळणाशी मी थांबते 

काहीशी उरते एकांतात 


हे असे मी किती जपावे 

मलाही वाटते काही असावे 

स्वछंद होऊनी त्याकरिता 

मी स्वतःला लुटत जावे 


शब्दाला न मिळावा शब्द 

मग कागद ही होतो जीर्ण 

का सतत मला माझी 

कविता भासते अपूर्ण 

-इतिश्रुति 


"सावली"

 एकदा एकाकी मना 

वाटून गेले सहज 

कठीण दिवस म्हणतात 

ते हेच का खरंच 


दिसतो तो स्वतः 

म्हणवतो शहाणा 

आपल्याचकडेच असावा  

सगळ्या जगाचा कमीपणा  


रोज उठावे स्वतः पाहावे   

कोण आपण समजेना  

असे किती दोष आपल्यात  

व्हावी का कोणती गणना  


स्वप्नी एकदा दिसलें होते  

मी खूप आनंदी तिथे   

सगळे माझे , माझे जग  

माझे तिथे गाणे होते  


जाग येता पुन्हा वाटले  

येईलही वेळ एक आपली  

कळू आपण ही स्वतःला एक दिवस  

तोवर आपण आणि आपली सावली  


-इतिश्रुति 




Tuesday, 2 June 2020

"बालपण"

               

             अडगळीतली पुस्तके पाहिली आणि सारं बालपण डोळ्यासमोरून झर्झरतं गेलं. खूप आठवणी लहानपणीच्या, मनाच्या कोपऱ्यात दडलेल्या असतात ज्या एरवी आठवत नाहीत पण एकदा आठवलं की सहसा सुटका होणे नाही अशी गत. प्रत्येक पुस्तकाची एक वेगळी आठवण आणि वेगळीच गोष्ट आहे. त्या वेळच्या असंख्य क्षणांच्या सोबती. लहानपणी मी जवळजवळ सगळं केलंय. छोट्या शाळेतून असल्याचे काही फायदे म्हणता येईल. नृत्य, अभिनय, चित्र, वक्तृत्व, अवांतर परीक्षा सगळंच. पुढे जाऊन नेमकं करायचं काय याचा पेच पडण्याचं हेच कारण असावं. स्वतःचा अंश सगळीकडे थोडा थोडा दिसायचा पण स्वतः आहोत काय हे इतक्या सहज कळलं नाही. लहानपणी मजा वाटायची. मला सर्वात जास्त आवडलेला विषय कोणता हे समजलेलेच नाही मला अजूनही. पण खरोखर आवडलेली एकमेव गोष्ट आहे ती म्हणजे अजाण बालपण आणि वेडी होऊन बागडणारी मी. स्वतःमध्ये इतकी गुंग. तिला शोधायचं आहे पुन्हा.

सगळे मिळावे क्षणात सरावे
काय उरावे तुजपाशी
तूच तुझा आनंद वेड्या
काय पुसशी जगाशी

क्षुल्लक सारे दुःख बापडे
क्षुल्लक असती आनंद
प्राक्तनाचे ओझेच ते
कशास करावा नसता खेद

अलगद घ्यावे स्वतःला
उचलूनि ओंजळीत धरावे
तुझ्या असण्याचे कशाला
जगा मागावे उगा पुरावे

जपणे स्वतःला
एवढेच शिकायचे 
नागड्या आनंदाने
दुःखातही बागडायचे 

-इतिश्रुती








                 
     





Sunday, 12 May 2019

"तंत्रज्ञान आणि मी"

            नुकताच ११ मे ला "जागतिक तंत्रज्ञान दिवस" साजरा झाला. तंत्रज्ञानाशी व्यावसायिक तशीच मानसिकरित्या मी जोडली गेलेली आहे. अर्थात सगळेच आहेत असं मला वाटतं . सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कितीतरी तंत्रज्ञाना च्या प्रगतीमुळे साध्य झालेल्या गोष्टींशी आपण जोडले गेलेलो असतो . त्याशिवाय आजच्या जगात इतकं सोयीस्कर जगणं शक्य नव्हतं .तेव्हाच माझा रोज वापर असणारा फोन खराब झाला आणि निमित्त झालं .. ब्लॉग लिहिण्याचं ! तब्बल वर्षभराने लिहीत आहे आज . नको दोष तंत्रज्ञानाला ! हा ब्लॉग पण त्यामुळेच लिहता येतोय. योगायोग की माहित नाही ... मी इन्स्टिटयूट ऑफ सायकॉलॉजिकल हेल्थ (IPH ही प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ आनंद नाडकर्णी यांची संस्था आहे ) यांचा "वेध" या कार्यक्रमातील अच्युत गोडबोले यांचं भाषण ऐकत होते आणि मला त्यांची खूप मतं पटली. तुम्हाला ऐकायचं असेल तर जरूर  "Achyut Godbole - Clearing the perspective of self" You tube वर पहा.
तर मुद्दा असा की तंत्रज्ञान , त्याचं शिक्षण , भारतातली अभियांत्रिकी च्या पोरांची अवस्था ... काही चांगल्या काही आंबट कथा याच्याबद्द्ल ऐकलेलं , अनुभवलेलं सगळं डोकयात सुरु झालं , तेव्हा विचार आला हे सगळं लिहून काढूया. म्हणून हा प्रयत्न.

         पूर्वी सगळे शाळा संपली की शिक्षक व्हायचे , BEd करायचे तसं सगळे आता अभियांत्रिकी करतात. मुख्य आपल्याला व्हायचं काय आहे आयुष्यात याची कल्पना नसते तेव्हा सरसकट सगळे मिळेल त्या शाखेला मिळेल त्या महाविद्यालयात  अभियांत्रिकीला जातात. अभियांत्रिकी नक्की काय आहे याची समज बोटांवर मोजल्या जाण्या इतक्या लोकांना असते. आणि यासाठी मुलांना ,पालकांना दोषी मानणं कितपत बरोबर आहे हा प्रश्न आहे. मागे भारताने जशी हरितक्रांती , दुग्धक्रांती अनुभवली तशी नव्या देशात IT क्रांती झाली , किंबहुना होत आहे आणि होत राहील असं म्हणण्यात काहीच वावगं वाटत नाही. जिथे ज्ञान आहे पैसा आहे असं क्षेत्रात आपण काम करावं असं वाटणं हे चूक नाही. मग  "पहले हमने science लिया फिर science ने हमारी लेली" ,"जिंदगी की बडी मिस्टेक इंजिनीरिंग की " वगैरे घोषवाक्य सुरु होतात , प्रत्यक्ष अभियांत्रिकी कॉलेजमध्येच, त्याच विद्यार्थ्यांकडून !याची कारणं काय असावीत याचा विचार करता येईल.

          काही लोकांना अभियंते करतात काय/ असतात काय माहिती नसतं मग "आम्हाला नाही आवडत तसं संगणकासमोर तास तास बसून काहीबाही लिहीत बसायचं" या निसर्गवेड्या म्हणवणाऱ्या आणि स्वतःला पुराणमतवादी म्हणून मिरवणाऱ्या मुलीही बोलायला कमी नसतात. काही नावं ठेवणारी जुनी माणसे "आजकाल काय कोणीही अभियंता होतं", "पडून असतात लाखोंनी डिग्री घेऊन असेच" मग "एम टेक करावं लागतं , त्याशिवाय नुसत्या बी टेक ला कोणी कुत्रा विचारात नाहीत " ही मध्यम वयीन लोकांची संकल्पना . खूप नवल वाटतं आणि कळतं आपल्याकडे कसे विचार रुजलेले आहेत समजात. आणि पाया हा आहे तरीच इमारत अशी आहे यात नवल वाटण्यासारखं काही उरत नाही.

           भारतात IT मध्ये खूप कंपन्या आहेत ज्या बाहेरील देशातील कंपन्यांचे "सर्विस आणि मेंटेनन्स" डिपार्टमेंट सांभाळतात. आणि त्यांचं काम मान्य आहे एकसुरी असतं. कामाचा ताण असतो , वेळ जास्त असतो. पण या सगळ्या लोकांच्या "टीम वर्क" मुळे तिथली कंपनी इतर गोष्टींमध्ये वेळ देऊ शकते आणि शेवटी जगाला ते तंत्रज्ञान वापरता येत असतं. कोणाचीही मेहनत वायफळ नाही जात आहे जर आपण या गोष्टीचा जागतिक विचार केला तर लक्षात येईल . आपल्याला जे येतंय , जे शिकायची इच्छा आहे त्यात पूर्ण झोकून देऊन काम करणं आणि स्थिर आयुष्य जगणं अशी अपेक्षा मला चूक वाटत नाही.  पण होय ते मनापासून असायला हवं. त्यातली सगळी माहिती असायला हवी.भारताच्या अर्थव्यवस्थेवर यामुळे परिणाम होतोय . शेकडो उलाढाली चालतात आणि देशाला त्याचा फायदा होतो. त्यामुळे माहिती नसताना असं बोलणं मला पटत नाही.

           असंही आहे की खूप लोकांची रुची अभियांत्रिकीच्या शिक्षण पद्धतीमुळे जाते; किंवा त्यांना या पद्धतीमुळे किंवा ते ज्या महाविद्यालयामध्ये शिकतात तिथल्या वातावरणामुळे त्यांना खरी गोम कधी कळत नाही. मी अशा खूप लोकांना दुसरं अमकं क्षेत्र का चांगलं आहे यावर बोलताना पाहते. माझ्या मते कुठली ही गोष्ट किंवा विषय दोन तीन पातळी खोलवर जाऊन अभ्यासला तर तो सुंदरच असतो. एका व्यक्तीला कितीतरी विषय आवडू शकतात. आणि तो त्यांचा अभ्यास करू शकत असतो. तेव्हा द्राक्षांबद्दल बोलणारे कोल्हे पहिले की वाटतं अरे यार थोडा समंजसपणे ,डोळसपणें  विचार कर.उद्या नॉन-टेक्निकल क्षेत्रात काम करताना या अभियंता लोकांनी बनवलेलं एखादं उपकरण न वापरता तुझं टार्गेट संपणार आहे का याचा.



           खरं संगणकामुळे बोलायचं झालं तर माझ्या मते आज प्रत्येकाने मजा म्हणून का होईना एक प्रोग्रामिंग ची भाषा शिकली पाहिजे . त्याने विचार करायची क्षमता वाढते असं स्टिव्ह जॉब्स म्हणून गेला कारण Programming is nothing but machine way interpretation of  our thinking in Human brain .संगणकाला विचार करता येत नाही पण ते आपल्याला विचार करायला शिकवतं . मी CS निवडताना असा विचार केला होता की संगणकाचं शिक्षण हे ग्लोबल आहे. कुठे ही जा ते वाया जाऊ शकत नाही. एका यंत्रा समोर बसून तुम्ही किती लोकांची आयुष्यं नियंत्रित करत असता तुम्हाला सुद्धा माहिती नसतं. आणि खरंच कुतूहल असणाऱ्या लोकांना हे माहित आहे सॉफ्टवेअर इतर क्षेत्रांमध्ये सुद्धा मदतीसाठी वापरलं  जातं .मला सांगा, संगणकाचा शोधच मुळात मानवाची मदत करणारं यंत्र बनवायच्या मानसातून लागला गेला असताना ते स्वाभाविक नाही का ! कला, मानवता, पर्यावरण आणि विज्ञान अशा क्षेत्रात सुद्धा तंत्रज्ञान वापरलं जात आहे ,
याबद्दल काही करावं असा प्रत्येक खऱ्या अभियंताचा मानस असला पाहिजे. शाळेत गणित आणि विज्ञानावरच लक्ष द्या म्हणताना शिक्षकांनी यांचा इतर विषयांना फायदा कसा होईल , सार्वजनिक आरोग्य ,समाजशात्र ,अर्थशास्त्र सारख्या विषयांमधली आव्हाने गणिताच्या सूत्रांनी  कशी सोडवावीत याच्याबद्दल सांगितलं पाहिजे आणि सध्या जे काही आधुनिकीकरणाला उठ सूट नाव ठेवायचे प्रकार पाहायला मिळतात ते थांबवून , या क्रांतीला आपलसं कसं करता येईल , यामध्ये वेगळं काय मांडता येईल यांचा विचार BE झालेल्या मुलांनी केला पाहिजे.

           आता मग तो भारतात करायचा की भारत बाहेर जाऊन हा प्रश्न येतो. आपण जिथून आलो त्या समाजाला आपला . फायदा करून द्यावा हे नक्कीच बरोबर आहे . इतर देशांपेक्षातंत्रज्ञानामध्ये प्रगतीची आपल्याला जास्त गरज आहे कारण सोप्पंय लोकसंख्याच एवढी आहे. आपली "IRCTC" किंवा "ST" महामंडळाची वेबसाईट पाहून इतके नवीन आयआयटी काढून काय फायदा असं वाटल्याशिवाय राहत नाही. आयआयटीच्या मुलांची "ग्रीन कार्ड" साठीची धडपड पाहून पण तसंच वाटतं जेव्हा अभियंता काय कोणीही होतं म्हणणारे लोकं पाहून वाटतं . हे क्षेत्र खूप जागतिक आहे. नवीन आहे. आणि मानवाच्या प्रगतीसाठी आहे अशी सकारात्मक विचारसरणी सर्वांची असावी असं मला वाटतं.आधुनिकीकरण आणि सांगणिकीकरण यांना नाव ठेवताना नाण्याच्या दोन बाजू असतात आणि जुन्या विचारांना चिकटून इतर देश प्रगती करत नाहीयेत ही गोष्ट बोलणाऱ्या लोकांनी लक्षात घेतली पाहिजे. बदलाला सामोरे जाऊन तो स्वीकारण्यात शहाणपण आहे. प्रत्येकाचा आदर करण्यात आहे. दुर्दैवाने भारतातली व्यवस्था या सगळ्याला कारणीभूत आहे पण खोलवर विचार केला तर सगळं सुटण्या सारखं आहे. IT industry मधल्या ,अभियांत्रीकी शिक्षण पद्धतीमधल्या त्रुटी आणि विचारांमधली दरी जोवर कमी होत नाही, तोवर सगळं अवघड आहे. पण पुणे आणि बंगलोर मध्ये असणारे "स्टार्ट अप्स" जे भारताचे आहेत , ज्यामुळे आपली बुद्धी आणि कष्ट वापरात येत आहेत त्याच्या कडे पाहून दिलासा वाटतो.आपण बनवलेले "प्रॉडक्ट्स" आपण च वापरावेत आणि इतरांना द्यावेत असं वाटणारी लोक पाहून हुरूप येतो . भारतात काही कंपन्या यावरचं ज्ञान वाढावं, प्रेरणा यावी म्हणून स्पर्धा ,कॉन्फरेन्स आयोजित करत आहेत आणि खरं तंत्रज्ञान जाणणारे लोक स्वतःहून पुढाकार घेऊन अशा योजनांमध्ये सहभागी होत आहेत हे बघायला मिळतं . याचीच आज खरी गरज आहे  .सगळ्या अभियंताना योग्य ती समज  यावी आणि इतर क्षेत्रातील लोकांनी नाक न मुरडता आदर करायला लागावं असं भविष्य अपेक्षित आहे.

शेवटी म्हणू वाटतं

ओ मीर-ए-कारवाँ

ले चल मुझे वहा

ये रात बने जहाँ सुबह

ओ मीर-ए-कारवाँ !

Friday, 26 January 2018

"जगणं"

अंधारलेल्या खोलीत
अडगळ अस्ताव्यस्त
खिडकीतून शिरू पाहणारा 
तिरपा किरण मस्त 
पांघरूण पसरलेलं 
आळसावलेली दुपार 
उत्साहाला आला होता 
कंटाळा आज फार 
सुट्टी म्हणाली काय हे
असं तुमचं वागणं! 
मी म्हणालो नको, नको 
नको झालंय जगणं... 
रोजरोज पळून पळून 
थकला आहे जीव 
जगण्यालाच आली आहे 
बिचाऱ्याची कीव
कसं हसायचं किती रडायचं 
हिशोब काही जमेना 
कुठे हरवलं काय मिळालं  
मला काही कळेना 
निपचित पडलेली नजर 
खिडकीपाशी गेली 
अन त्या किराणाशी माझी 
सहज मैत्री झाली 
नकळत माझ्या तो 
बोलून गेला शब्द  
मीही असाच हरवलो होतो 
सकाळ होती स्तब्ध 
भटकत भटकत आलो इथवर
बाहेर माझं लक्ख आभाळ 
उठावं लागेल चालावं लागेल ,
जोवर होत नाही संध्याकाळ !



Saturday, 24 September 2016

"चांदण्या "

नको होऊ तू हताश
नको मिटू पापण्या
काळोखाच्या पोटातसुद्धा
लपल्या आहेत चांदण्या
धडे मात्र गिरवत रहा
सोडू नको कोरं पान
पुस्तकाच्या मध्येच कदाचित
सगळं काही होईल छान
अधिक वजा गणित नको
नको काही मोजण्या....
झटक धूळ अडगळीतली
खोली सगळी साफ कर
स्वतःसाठी स्वतःला
एवढ्यापुरतं माफ कर
दिवा होऊन पेटून जा
सज्ज हो तेवण्या......
बघता बघता रात्र सरेल
पहाट होत एके दिवशी
नव्या किरणासंगे तेव्हा
चांदरात जुनी तुजपाशी
भल्या भल्या पहाडाच्या तेव्हा
करशील तू लेण्या......
काळोखाच्या पोटातसुद्धा
लपल्या आहेत चांदण्या
#इतिश्रुती








Tuesday, 23 August 2016

"आयुष्य म्हणजे.."

                                        फार दिवस झाले काही लिहलं नाही म्हणून कसंकसंच झालं. ब्लॉग उघडून काहीबाही लिहीत बसले. अजिबात जमत नव्हतं.करायला काहीच नाही.काय बेकार आहे आयुष्य! लोक काय काय करतात, आपण कसं जगतोय, किती वाईट झालंय ,मला हे असं नकोय...काहीही वाटायला लागलं.मैत्रिणीला घेऊन चक्कर टाकली तेव्हा खूप गप्पा झाल्या.थोडं मोकळं वाटलं. इतकं पण वाईट नाहीए आयुष्य! एका तासात मत बदललं.किती दिवस जुन्या गोष्टीचं दुखणं घेऊन जगायचं.वाटत होतं,जे आहे ते फार काही वाईट नाही! का म्हणून आयुष्याला दोष देत जगायचं! रस्ताभर विचार करत होते! आयुष्याबद्दल जे काही थोडंफार समजलंय, ते म्हणजे Life is a struggle ! आपण अपेक्षा करतो ते कधी होतं कधी नाही आणि हो !आपण परत अपेक्षा करतो !हे असंच चालू राहतं. कधीकधी अनपेक्षित आनंद होतो तसंच कधीकधी दुःख...हिशोब क्लीअर!हे असं काही आहे जे थांबत नाही...वाहत राहतं ! आणि आपणही वेळेप्रमाणे बदलायचं शिकतो, हा सुखदुःखाचा प्रवास आपल्याला घडवत राहतो.हे असंच असतं! घडून गेलेल्या गोष्टींबद्दल दुःख करण्यात आज का घालवायचा! खाऊच्या बरणीत फसलेला हात सोडवला की दुखायचा बंद होतो अगदी तसं! खरंच जाऊ देणं इतकं अवघड आहे? नक्कीच नाही!उलट ते सुंदर आहे! ती एक सुरुवात असेल आयुष्याच्या एका नव्या पर्वाची!जिथे माझ्याकडे फार विशेष काही नसलं तरी अनुभव असतील, काय करावं हे माहित नसलं तरी काय करू नये हे माहित असेल. तेच खूप महत्वाचं असतं नाही? काय करावं असं आदर्श चित्र सगळ्यांना माहित असतं. पण काय काय करू नये असं सुचत नाही पटकन! ते अनुभवानेच मिळत असावं. जेव्हा आपल्याकडे काही नसतं , तेव्हा अनुभव असतो म्हणतात ते खोटं नाही! तर "don't blame just play the game" attitude सोबत पुन्हा मार्गाला लागावं म्हणतेय! काय माहित काय मिळेल! काम मात्र करत राहावं लागेल.खूप खूप अपेक्षा कराव्या लागतील ,खूप खूप वाईट वाटावं लागेल, खूप खूप अनपेक्षित घडावं लागेल,असेच अनुभव यावे लागतील...मग तर शिकेन ना मी ! मग कुठे चूक-बरोबर समजेल,म्हणजे जे झालं ते चूक नाहीच मुळी! It was a part of a plan! okay...!
तर हे आहे आयुष्य! विषय मिळत नाही म्हणता म्हणता अख्खा परिच्छेद लिहायला लावणारं, मला नको नको वाटत असताना जगायला शिकवणारं! नाही नाही म्हणत म्हणत सगळं काही देणारं! खूप परीक्षा बघणारं, कधीतरी बक्षीससुद्धा देणारं...किती छान आहे हे सगळं! खरंच खूप छान आहे , नाही का?
आयुष्य म्हणजे ,
रोज एक नवा सूर्य
रोज तोच जुना तारा
नजरेचा खेळ तो खरा
बाकी सारा सारा पसारा ....!
#इतिश्रुती 

Monday, 25 July 2016

"नको ते"

लाख वाटले व्हावे हवे ते
पण होत नको तेच आहे

त्यांनी गिळून पचवला म्हणे अपमान
मी मनस्ताप व्यर्थ ओकतेच आहे

तोलला गेला तराजूत माझा खरेपणासुद्धा
खोटेपणाला त्यांच्या मात्र माप झुकतेच आहे

केला विपर्यास मी हातमिळवणीचा एकदा
टाळी एका हाताची अजून मी ऐकतेच आहे

हो, भरला असेल माझा त्यांच्यामताचा घडा
तरी काठाशी हे चार उसासे मी टाकतेच आहे

नका मांडू माझ्यापुढे लांबलचक पदावल्यांना
बेरीज साधी दोन आकडी अजून मी चुकतेच आहे ... 

"अशाच एका रात्री"

अशाच एका रात्री जेव्हा 
व्यापाची खिचडी पोटात जाते 
पाणी पिऊन ढेकर देऊन 
मी मापाच्या अंथरुणात पडून राहते 

अशाच एका रात्री जेव्हा 
गजर लावायचे नसतात उद्याचे 
सताड पापण्यांसमवेत माझ्या 
टिकटिक,गरगर आवाज गूढ छताचे

अशाच एका रात्री जेव्हा 
फितूर कवडसा खिडकीतून डोकावतो 
ओठांवर बोट ठेवीत 
दुधाळ गुपित सांगून जातो 

अशाच एका रात्री जेव्हा 
गुपितावर मन भाळतं 
रात्र रंगवण्याचं वेडं वेड
खिडकीच्या गजापर्यंत धावतं 

अशाच एका रात्री जेव्हा 
जांभई कशी तत्पर येते 
आठवण मला स्वप्नपटाची 
हळूच शहाणी करून जाते 

अशाच एका रात्री जेव्हा 
मी फितुरासंगे पळू पाहते 
चिकटवलेले चांदणे बघत 
मीच पापण्या ओढून घेते 

अशाच एका रात्री ....  

Wednesday, 13 July 2016

"पाऊस अन काय ...!"

                                   
                                     आळसावलेली सकाळ,रिपरिप कोसळणारा पाऊस त्यात सोमवार ! मळभ आकाशाला तसं मनावरही.असल्या थंडीत पांघरूण सोडवत नव्हतं. पण उठणं भाग होतं.जुनी छत्री काढली आणि निघाले. तिचं बिचारीचं आता वय होत आलेलं. तशी बऱ्यापैकी कामचलाऊ होती.एका हातात छत्री आणि एका  हातात बॉटल सांभाळत चप्पल घालायच्या प्रयत्नात तोल जाऊन समोरच्या बटणांवर डोकं आदळलं तेव्हा रूमच्या सगळ्या लाईट्स लागल्या. मग तसंच पुन्हा आदळून बंद केल्या.असो !कडेकडेने चालत होते तरी एका गाडीने चिखलाचा फवारा उडवलाच ! तुझ्या तर... म्हणेपर्यंत गाडी नाहीशी झालेली .रिक्षेतून उतरताना फोनने चिखलात उडी मारली आणि त्याच्या बॅटरी आणि बॉडीचा तिथेच घटस्फोट झाला.त्यांना कसंबसं बॅगेत भरती केलं अन स्टेशनसाठीच्या बसची वाट बघत उभी राहिले. एवढ्यात बस येण्याची काही चिन्ह नव्हती .मग पुन्हा रिक्षेकडे वळले.
"तीस रुपये होतील मॅडम " अतिशय भोळसट चेहऱ्याच्या रिक्षावाल्याने सांगितलं.
"येडे समजता का हो तुम्ही ?" माझ्या या वाक्याने त्याचा चेहरा पडला आणि निमूट वीस रुपये घेण्याचं कबूल करवून निघाले.मी कडेला बसलेली.शेजारी दाटीवाटीत बसवलेली लोकं. त्यांना कुठे बघत बसू ! बाहेर बघताना जाणवलं ,खरंच आज खूपच पाऊस पडतोय .म्हणजे फार दिवसांपासून चालू होता तसा ,पण इतका आजच पडला. पुण्याचा पाऊस खूप बोर वाटतो मला. एकसारख्याच सरी, तशाच स्टाईलमध्ये. एकाच इयत्तेतल्या विद्यार्थ्यांसारख्या. बऱ्याचदा हा पाऊस न भिजवणाराच असतो.एकदम मेडीओकर.पावसावर बेधुंद होऊन प्रेमबीम करावं असं काही (म्हणजे हड..! )वाटत नव्हतं.एक तर एवढ्या छान झोपेचा त्याग करून धडपड करत आले,त्यात फोन खराब झाला. आजूबाजूला चिकचिक, रिक्षावाल्याचे मस्तवाल फवारे आणि सगळं बघत बसण्याशिवाय काही पर्याय नसलेली मी..पावसापासून स्वतःला वाचवण्यासाठी मी छत्री उघडून आडवी धरली होती . रिक्षेला दार होईल अशी . तरी सुद्धा एक ओघळ माझ्या पॅंटीवर गळत होता !चायला ह्याच्या !बोरींग बोरिंग बोरिंग !!!
                                      Whatsapp बघितलं तेव्हा सिंगल लोकांचे स्टेटस पाऊस आणि एकटेपणाच्या संदर्भातले सापडले . बऱ्याच मुलींनी wow पाऊस, मन पाऊस वगैरे लिहलेलं. त्यांच्या एवढ्या रसिकतेचं कौतुक वगैरे वाटून गेलं. मीही कधी या पावसावर कविता केली होती यावर माझा विश्वास बसत नव्हता. पॅन्टवर उडालेला चिखल दिसला तेव्हा असा राग आला पावसाचा! खरंच पावसाला काही manners च नसतात! मनाला येईल तसं वागतो! कधी मुसळधार, कधी नुसत्या बारीक थेंबांचा खेळ. बेशिस्त अगदी! सगळं नॉर्मल चालू असताना अशी पंचाईत करतो की बस ! मी कधीची भुवया आवळत बोटं मोडत बसलेली. पाऊस नावाची कोणी व्यक्ती वगैरे असती तर समोर उभी करून चांगलं दोन-चार सुनावता तरी आलं असतं !हा काय माज उगाच !शेवटी चिडून बंदच केली मी छत्री ! भिजव बुवा एकदाचा ! मग काय ,त्याच्या एकएक थेंबाची बरसात चेहऱ्यावर !कुडकुडल्यासारखं झालं. मी कधी मूठ सोडवून पाण्याशी खेळायला लागले मलाच कळलं नाही . सगळी भिजत होते मी.  मलाच वाटलं,एवढाही वाईट नाहीए हं पाऊस ...!हो ! लहाणपणी मुद्दाम पावसात भिजायला जायचो तेव्हा मजा यायची !अपार्टमेंटच्या बच्चेपार्टीला गोळा करून येतो तेवढा डान्ससुद्धा करायचो आम्ही पावसात ! डोकं पुसल्यावर आई गरम गरम भजी करायची. मक्याचं कणीस मीठ-लिंबू- तिखट लावून! पण ते सगळं घरी !अच्छा म्हणजे आपल्या situation नुसार कधी पाऊस बरा तर कधी बुरा वाटतो तर ! पण त्याला काय त्याचं ! 'Who cares' attitude साल्याचा ! भिजवलंच ! इतका धुंद कसा असू शकतो हा स्वतःमध्ये !  त्याला दूषण देणाऱ्या लोकांनासुद्धा लळा लागून जावा म्हणजे!ठरवूनसुद्धा त्याच्यावर चिडता येत नाही. न जाणे कसलं सौंदर्य आहे याच्या स्वभावात ! मी विचारात पडले.
                                      पोचले तेव्हा बऱ्यापैकी ओसरला होता. हो ! पोचल्यावर ओसरला !खिडकीतून सगळं हिरवं हिरवं दिसत होतं. थंडी होतीच. सर अजून यायचे होते.मी वहीच्या मागचं पान काढून सुरू झाले.
शब्दशब्द चिंब झाला
शहारलं कोरं पान
भावसरी बरसल्या
उमललं कवीमन...





                                     
                                           

Wednesday, 15 June 2016

"सांज "

सांज दाटून गं आली
मना न्हाऊन ती गेली
तशी हुरहूर ओली
मग भुईभर झाली
संगे अवखळ वारा
अन आसमंत सारा
यात बुजरा शहारा
बघ शोधतो निवारा
वेल कावरी बावरी
फुले नाजूक सावरी
त्यात बेधुंद या सरी
जणू नाचल्याच दारी  
अशी गंधाळली माती
दव लाजलाच देठी
तशी बहरली प्रीती
शब्द आतुरला ओठी
सारं उधाण उधाण
मना आनंद गोंदण
नाद चुकला स्पंदन
येता ओली आठवण
या वेड्या पावसात
वेडी गाणी गात गात
सात रंगांनी एकांत
जणू रंगला नभात…!



Friday, 27 May 2016

"एकटेपणा,एकटेपणा..वगैरे"

                                      
                          

                                     भल्या रणांगणात उमद्या घोड्याने दौडत जावं तशी लेखणी पानांवरून चाललेली. बिचाऱ्या पानांचं पांढरत्व संपुष्टात येऊन पार काळं निळं होत होतं. एक झालं की पुढचं पान तत्परतेने हजर व्हायचं आणि नव्या युद्धाला सुरुवात व्हायची. आज कित्येक दिवसांनंतर मी गच्चीवर अभ्यासाला आलेली . फांदीवरली चिमणी चिवचिवली आणि उन्हं उतरायला आल्याचं लक्षात आलं.ही गच्ची म्हणजे माझी आवडती जागा!संध्याकाळी तिथे असताना एक वेगळीच नशा असते. दिवसभर तेवणारा सूर्य पार लालबुंद होऊन बुडून जातो. आभाळाला कसा रंग चढतो. रहदारी जाणवायला लागते.क्षणात सारं बदलतं !मंद लाटेची झुळूक आली तेव्हा जागेवरची उठले. दुपारपासून केसांचा गोतावळा आडव्या तिडव्या पिनांमध्ये गुंतलेला ;त्याची आधी सुटका केली.असं खूप काम केलं की काहीवेळाने उगाच चुकल्याचुकल्यासारखं वाटत राहतं. खाली येऊन fresh झाले अन म्हटलं आज फेरफटका मारून यावा. अशा थोड्या रम्य , थोड्या एकट्या , थोड्या मोकळ्या अशा वातावरणात गाण्यांसोबत फेरफटका मारण्याची मजाच भारी ! मग मुसाफिर हुं यारो ,मैं जिंदगी का साथ निभाता चला गया ,ये शाम मस्तानी वगैरे मूड झाला . असं सगळं एकदम शृंगारिक वाटायला लागलं . रस्त्यावर जाणाऱ्या लोकांचे चेहरे बघत गाण्याच्या तालावर चालत चालत बराच वेळ गेला. प्रत्येकाची आपापली कामं चालू होती . कोणी दुकानात बसून हिशोब करत होतं, कोणी आपल्या आपल्या मित्र-मैत्रिणीसमवेत वेळ घालत पडीक बसलेलं,कोणी परतायच्या मार्गावर अन काय काय ! पण त्यांचे expressions ,ते एकंदरीत वातावरण आणि मोकाट फिरणारी मी ! किती दिवसांनी माझ्यासोबत होता तो माझा एकटेपणा ! मी आणि तो… माझ्यासाठी! माणूस तसा सामाजिक प्राणी. जन्मापासून त्याच्या आजूबाजूला त्याची काळजी घेणारे आई बाबा,नातेवाईक, नंतर काय त्याचे ४ मित्र…वगैरे असतात;पण तो एकटा असला की …तो त्याचा असतो! एकटेपणा शत्रू असूच शकत नाही ,तो खूप आगाऊ मित्र असतो. छुपारुस्तम !एकदा त्याच्या नादी लागलं , मग बस दिल है की मानता नही! आपल्या आत आनंद शोधत राहणं आपल्याला कधी आवडायला लागतं आपलं आपल्यालाच कळत नाही. काही काही आठवत नाही ! उगाच दु:ख नाही की कसला फार आनंद नाही. आहे त्या क्षणात,आहे त्या रुपात ,आहे तसं ,फक्त जगायला शिकवणारा हा एकटेपणा खूप समाधान देऊन जातो , स्वत:वर प्रेम करायला शिकवतो.एक प्रकारचं स्वातंत्र्य असतं . स्वतःला केंद्रित करायला लावतं .ते नकळत होणारं प्रेम असतं .स्वतःच्या प्रेमात खुशाल पडावं .थोडं स्वत:साठी खास वेळ काढून जगावं . मग ठरलं तर ,रोज आपापल्या कामात गुंतलेल्या स्वतःला जरासा उसवून पुन्हा ओवायचं, पुन्हा टवटवीत होण्यासाठी !
#Happy Solitude :)

Friday, 20 May 2016

"आप तो बदल गए !"

तसं मी मराठीच लिहते , पण सहज हिंदीमध्ये सुचलेली एक कविता ….

उस रात हम करवटे बदलते गए
बेखयालीमें यादे गिनते गए
देखा वो आसमान असलमें जो खाली था
छुनेकी कोशिशोंमें कितने कैसे गिरते गए

गिरते गिरते देखो पहुंचे   
अलबेली बारीशके पास
सुना था कभी ख्वाबोंमें सिमटे बादल इसके
बुंद बुंद युंही बिखरते गए

देखी हमने वो बरसात जो रातभर चली
देखे थे जमीनपर भीगते लोगोंको भी
अनजान उस भीडमें पता नही कैसे
हम बुंदे मनाना सीख गए

ये खुशी और गमके साये
अभी होने लगे हमसे खफ़ा
शिकायत है उन्हे हमारी हसीसे क्योंकी
हम शिकायतोपरभी मुस्कुराते गए

और लोगोंने आखिर कह डाला हमें की 
आप तो बदल गए
आप तो बदल गए…!

Monday, 18 April 2016

"शृंगार"

सांजावलेला झुलता गारवा
लगबग कशी बघ त्या पारवा
निळ्या डोळ्यात भिजता काजळ
आला आला केसर चांदवा

गोठली पार निशा ती सुंदरा
अन ताऱ्यांचा मंद शहारा
पुनवेच्या त्या मुग्ध नशेने
झाला झाला अंबर गहिरा

रात्र न्हाली निखळ अवखळ
येता सागरा भरती मंगळ
स्पर्श होता पूर्णबिंबाचा
ओला ओला बहरला काळ

अन मग झाली तृप्त पहाट
धुसर निजला शृंगारथाट
नेसून पितांबर जागा झाला
फुलला फुलला दिवस सुखात !

"आतुरता"

टिपूर चांदणे आकाशात बहरता
कळी खुले मनाची उगा आठवण होता

तो असेल याच आकाशाच्या खाली
निवांत त्या ताऱ्याला जरी हा पाही
तारयात तयाला दिसेन मी का आता
कळी खुले मनाची उगा आठवण होता

माझ्यासंगे ही रात्र तशी ती एकटी
तो नाही तरी भास असती सोबती
तो हसतो खळीतून भावनांचा कसा गुंता
कळी खुले मनाची उगा आठवण होता

वारा मजला थांबला बरा वाटे
अन डोळ्यांमध्ये हलके उदासी दाटे
येईल कधी तो गाणे माझे गाता
कळी खुले मनाची उगा आठवण होता

मन माझे अर्धे अन पुरते सुकलेले
तो अर्धा तिकडे पण अंतर हे चिमुकले
मिटता मी डोळे तोच आणि आतुरता
कळी खुले मनाची उगा आठवण होता

Tuesday, 9 February 2016

"फुलपाखरु"

                              

                               आज जरा निवांत वेळ होता. माझं मन आठवणीच्या गावातून निघायचं नाव घेत नव्हतं .काय काय आठवलं मला ..विचारांत असताना वहीवरलं फुलापाखराचं चित्र दिसलं. आम्हाला शाळेत असताना चित्रकलेच्या तासाला फुलपाखरू काढायला सांगितलं जाई. बाकी कशापेक्षाही फुलपाखरू रंगवण्याचा आनंद वेगळाच असे. रंगांची मुक्तहस्त उधळण होई .मराठीतसुद्धा  "छान किती दिसते फुलपाखरू " ही कविता होती (ज्याचं आता remix  गाणं केलयं :P ). आई मला झोपेतून उठवताना त्या कवितेला edit करून  "छान किती दिसते माझी चिनू " असं म्हणायची,तेव्हापासून फुलपाखरू माझं सगळ्यात आवडतं झालं होतं. आमच्या gallery मध्ये कधीकधी बघायला मिळायचं.त्याच्या पंखांच्या रंगसंगतीचा अजूनही हेवा वाटतो मला. मी पाचवीत असतानाची गोष्ट असेल. आईपासून वही लपवून लपवून Home Work करताना मी मागच्या पानावर कविता करत बसे. एक कविता मला पुसटशी आठवली . या कवितेला स्वतः चाल लाऊन मी संध्याकाळी शुभंकरोती म्हणताना म्हणत बसे.( come on ! वय बघा माझं  :P ) त्याची सुरुवात काही अशी होती…
                              आई ,मी जर झाले फुलपाखरु ,
                              दिसणार नाही मी तुला बरं ,
                              उंच उंच उडत जाईन अन
                              आभाळातून तुला मी पाहीन
(LOL ! आता मी हसतेय पण तेव्हा जाम भारी वाटलेलं मला ! आणखी पुढे काही असं केलं होतं…. )
                               फुलावर छोटेसे घर बांधीन
                               त्यावर राहायला जाऊ आपण
                               तू ,बाबा ,मी अन दादा ही
                               सारे मिळून जगूया आनंदानं
                               आता सुख हवे तर दु:ख हवे
                               प्रत्येकाच्या जगण्याला हे बोध हवे
                               पण साऱ्या सुखात सुख
                               या फुलपाखराचे
                               मधुकण गोळा करून आणायचे … !
                               या फुलापाखरावरचं मला आवडणारं Miley Cyrus चं  "Butterfly fly away"  हे गाणं त्याच वेळेला आठवलं. त्याचे काही lyrics असे आहेत ,
Caterpillar in the tree
How you wonder who you'll be
Can't go far but you can always dream
Wish you may and wish you might
Don't you worry, hold on tight
I promise you there will come a day
Butterfly fly away

Butterfly fly away
Got your wings, now you can't stay
Take those dreams and make them all come true

Butterfly fly away 
You've been waiting for this day
All along you've known just what to do

Butterfly, butterfly, butterfly
Butterfly fly away

आणि आत्ता facebook वर वाचनात आलेली ही कविता ,

सोपे नसते फुलपाखरू होणे
पूर्ण असण्याच्या सर्व इच्छांचे आकार
मिटवून घ्यायचे आणि
उरलेल्या रेषेसारखा स्वीकारायचा देह
सर्व रंग सर्व शक्ती
संक्रमीत होऊ द्यायची पंखात
कोश फाडून बाहेर पडताना
आणि केवळ पंख होऊन
भिरभिरत राहायचे पानाफुलात
त्यांच्यासारखेच होऊन !
जगण्याच्या असंख्य छटा पंखाना देऊन टाकणे
केवळ भिरभिरण्यासाठी
सोपे नसते ….
फुलपाखरू होणे सोपे नसते !
असं random वाचताना random विचारातच कुठेतरी एक धागा सापडून जातो ,जो उगाच ओवत राहतो गोष्टीना..
आज काहीसं असंच झालयं! मनासारखं जगण्याचं स्वप्न आणि फुलपाखरू !आधी माझी बालिश कविता ,स्वप्नाकडे जाताना वाटलेलं Miley चं गाणं आणि स्वप्न जगताना reality व्यतीत करणारी ही कविता ! हे विचारमंथन मला बरंच काही सांगून गेलं ! :)

"हितगुज"


आज जरा भटकू म्हटलं                                  
व्यापाला या झटकू म्हटलं
शोधुया एक हाक जवळली 
शंका जिथे स्वतः निवळली 
आडोशाला गाठू म्हटलं                              
दुःख मनाचं वाटू म्हटलं 
गर्दीतला सपाट चेहरा 
गर्दीतच राहू देत 
बाहेर येऊन माझ्यातून 
मला जरा पाहू देत 
वाहु देत जाणिवांना
भार अवघा लोटू म्हटलं 
बस ,माझी मला असावी साथ 
अन जगण्याला यावी बात 
मग हसतच मी एकांताला 
ये असाच, भेटू म्हटलं 
भिजता भिजता मी आटुन जावं 
तरी मनाने नटून जावं 
माझ्यात मला मीच नव्याने 
पुन्हा एकदा ओतु म्हटलं 
आज जरा भटकू म्हटलं                                  
व्यापाला या झटकू म्हटलं.... 

Tuesday, 5 January 2016

"तू भीड..बिंदास !"


                                        रात्री बूट न काढताच झोपी गेलो . स्वप्नातसुद्धा घड्याळ वाजत होतं. टिक टाक टिक टाक….!दोन - तीन वेळा दचकून जागा झालो. वाटलं उठून जरा फिरून यावं . पण म्हटलं नको !उद्या जाग नाही यायची... मुकाट्यानं झोपी गेलो. सकाळी वेळेत हजार झालो .बॉस घाई घाईत माझी जुनी फ़ाईल चाळत होता. त्याच्या कपाळावरच्या आठ्या आणि माझ्या कपाळावरचा घाम थेट प्रमाणात वाढत होता.
"मि . अभ्यंकर !"
"येस सर …. "
"तुम्हाला उद्या लेखी कळवतो "
"ओके सर …. "मी म्हणायच्या आत तो निघून गेला .
                                       दिवसभराचं काम कसं बसं आटोपून संध्याकाळी बागेत पोचलो. तिथे रागिणी घुस्श्यातच उभी होती. तिला बघून माझी टरकली.
"आजसुद्धा उशीर !"
"अगं…. "
आता हिला काय सांगायचं !
"काम वाढलं ग आज "
"नेहमीचंच आहे हे आता आणि lmnopqrs …xyz ! "
तिची वटवट चालूच राहिली . तिला सोडलं आणि सरळ घरी यायला निघालो. थंडी वाढली होती. कानाला बांधायला हवं होतं काहीतरी.. पण लक्षातच आलं नाही !सध्या माझ्या सोबत फक्त माझ्या बाईकचा आवाज आहे असं वाटून गेलं !लहानपणी ब्रूम ब्रूम पीप पीप करताना किती भारी वाटायचं !आता बाइक बोर झालीये. कधी बदललो मी…कधी ?काहीच आठवत नाहीये. हेच होते ते दिवस…असाच जगत होतो मी …पण मागे वळून बघतो तर…इतकं wierd का दिसतंय !असं वाटलं त्या पुलावरून जाताना ओरडत सुटावं !नाहीतर कुठे तरी डोंगरावर जाउन झोकून द्यावं !पडलो तर पडलो !नको… अर्धवट लागलं तर मलाच रडत यावं लागेल.नाहीतर कानात बोटे घालून अगदी सुईई आवाज येईपर्यंत डोळे मिटून शांत बसावं … मी बाईक कॉर्नरला थांबवली. टाय सैल केला आणि चप्पल काढून समुद्रकिनाऱ्यावर चालत राहिलो. दिवसभर फेसाळून थकलेल्या लाटा आणि मी !शांत…थंड…एकांत ! बाबा म्हणायचे ते गाणं आठवलं , "अकेला हुं मै ,इस दुनियामें ... कोई साथी है तो मेरा साया...अकेला हुं मै!......
तरी असंच आवडत होतं मला ! चालताना समोर अचानक एक फुगेवाला आला. फुगेवाला कसला.. पोरगं होतं बारकं !काळाकुट्ट  चमनगोटा,त्यावर मळकट रुमाल.. एकदम भाईसारखा बांधलेला…अर्धवट फाटलेली बाही; तिही स्टाईल मध्ये दुमडलेली…खाकी हाफ चड्डी…मधून मधून फुर फुर बाहेर येणारा शेंबूड पोराची तारांबळ उडवत होता. डोळ्यात निरागसता दिसत होती. मला म्हणाला ,
"फुगा घ्या की ओ "
त्याने एकदा फुर केलं.
मी हसलो. आता त्याचे फुगे मी कुठं नेणार !
"नको बाबा !मी काय करणार यांचं ! "
कसलासा लूक देऊन पळाला .
'भारी होता तो !' मला वाटलं . माझ्या सहाव्या वाढदिवसाला किती फुगे आणले होते आजोबांनी ! फुगा फुगवायला फार आवडायचं मला !पार थोबाड सुजेपर्यंत चालू असायचं !रंगेबेरंगी फुगा आधी एका चिमटीत घ्यायचा, मग दुसऱ्या चिमटीने लांब ओढून ओठांशी न्यायचा.. गालांचे फुगे करून फ़ू SS हवा सोडायची .. हळूहळू..तिरक्या डोळ्यांनी खाली बघत अंदाज घ्यायचा आणि विचारायचं , "एवढा ?ठीक आहे ना ?" होकार आला की त्याच्या तोंडाला गाठ बांधून केलेला सगळा आटापिटा तळहाताने उडवून लावायचा ! आणि मग दुसरा फुगा…
कधी भिंतीवर सजवायचे कधी नुसतेच सोडून द्यायचे …'मी फुगवलाय हा फुगा'  असं मित्रांना दाखवताना कसलं भारी वाटायचं ! आजोबा गेल्यापासून मला काय आवडतं विचारणारं कोणी राहिलंच नाही…
काय विचार करतोय मी हा ! माझं मलाच हसू आलं ! भरकटलोय… भरकटलोय…मी …. !
                                         बाईक स्टार्ट केली तेव्हा ते शेंबड पोरगं लहान बहिणीला सोबत ओढत नेत फुगे विकत होतं. सगळे नाही म्हणायचे तेव्हा हिरमुसून बसायचं बिचारं !त्याला जवळ बोलावलं,
"ओय छोटू ! "
"दादा आज कोणीच घेतले नाहीत माझे फुगे !"
"ऐक ,आण इकडे ते सगळे "
"खरंच….?"त्याचे  मोठ्ठाले डोळे अजून मोठे करत त्याने म्हटलं. 
त्याने आनंदाने सगळे फुगे माझ्या हवाली केले तेव्हा त्याची बारकी त्याच्या कानात काहीतरी पुटपुटली. तो तिला गप्प बसायची खूण करत पैसे मोजत होता.कसली गोड होती त्याची स्माईल !रस्त्यावरून चक्क गाडीला फुगे बांधून मी जात होतो…ब्रूम ब्रूम पीप पीप करत!
झोपताना मी गात होतो..
'तू भीड ,बिंदास !
बोले तो एकदम झकास…
चिल मार ,फुल मार
जरा हवा येऊ दे… थंडगार!
टेन्शन साला फालतू है
तू तो मर्सिडिज,
कायको बनता ऑल्टो है ?
लेके देख एक जिंदा श्वास !
एकदम खास
आता बास..
तू भीड…बिंदास !'

Tuesday, 22 December 2015

"करत रहा !"

                              "आयुष्यात असं काहीतरी करावं की आयुष्यभर आपल्याला एकदम बाप वाटलं पाहिजे !"डबल सीट चा माझा सगळ्यात आवडता dialogue! खरंच ! बऱ्याचदा वाटतं हे नाही जमणार, ते नाही होणार ; मग अपेक्षा करणंच सोडून देतो आपण ! "समाधानी व्यक्ती हीच सुखी व्यक्ती "च्या शीर्षकाखाली पूर्णविराम देऊन मोकळे होतो. मोठ्ठं स्वप्न मोठ्ठंच राहतं आणि आपण लहान ते लहानच! का नाही घ्यायची उडी ? आपल्या comfort zone च्या बाहेर येऊन एकदाच स्वतःला आजमावून का नाही बघायचं ? फार फार तर काय होईल ? हरून जाऊ !एवढंच ना !हरणं काय असतं ते समजेल तरी ! आणि जिंकलो तर... ! हे जिंकणं म्हणजे तरी काय असतं .... फक्त एक प्रमाणपत्र, आपल्या प्रयत्नांचा पुरावा !मंजिल का असली मजा तो रास्तोमें है !try करण्यात , fail होण्यात तर खरं जगणं आहे ! खुशाल प्रयत्न करा ,निर्लज्ज होऊन हरत रहा ! पण स्वप्नाला  विसरू नका !
#KeepGoing!


करत रहा करत रहा
शब्द दोन हे स्मरत रहा

अपमानानं सलत रहा
उशीवर तळमळत रहा
दे झिडकारून जांभईला त्या
रात्र एकटा पोखरत रहा

मातून दे तू संथ बहाणे
उठू देत खडबडून तराणे
तू झुंज तू गुंज
या क्षणांना नाचवत रहा

चढव सुंदर साज आंधीचा
झळकू देत घाम चांदीचा
उगा चालू नको ,कुठे थांबू नको
उंचावरून कधी कोसळून पहा

वात करून नसेनसेची
आतून सगळा  पेटत रहा
हरू नको आता विरु नको
तू बनून काजळी उरत रहा

कर एकदा तर्र हितगुज
थुंकून दे या जगाची कुजबूज
थोडाच हो ,जरा वेडाच हो
नशेत तुझ्याच तू झिंगत रहा

करत रहा करत रहा,
शब्द दोन हे स्मरत रहा





Friday, 11 December 2015

"नभ"

                                          एका वर्षापूर्वीचा विचार करता लक्षात येतंय किती बदल होतोय आयुष्यात!
तासागणिक 'तेच आहे' असं वाटणारं आयुष्य काटे फिरवून तपासलं तर आश्चर्य वाटतं !Priorities बदलत आहेत,विचार बदलत आहेत आणि त्यानुसार वागणंसुद्धा.. म्हटलं तर नकळत ,म्हटलं तर सगळं कळून !या बदलांमुळेच आयुष्य स्थिर आहे !या सतत होणाऱ्या आणि अवचित जाणवणाऱ्या बदलांचा आपल्यावर प्रचंड प्रभाव पडत असतो ,त्यातून नवीन गोष्टी उमजत जातात पण; 'दिवसामागून दिवस चालले ,ऋतुमागूनि ऋतू ' तरीसुद्धा काही गोष्टी अगदी तशाच असतात.. आधीसारख्या ! आपल्या जवळच्या व्यक्तीशी झालेलं बोलणं म्हणा किंवा त्याच जुन्याच आठवणीवर आपलं तसंच खिदळणं म्हणा ,आपल्याला वाटणारा तोच आपलेपणा ,तीच काळजी आणि तसाच विश्वास !आपल्या secondary storage device मधल्या या गोष्टी नुसत्या प्रभावशाली नसतात तर स्वत्वाची जाणीव करून देतात. कुठेतरी केंद्रित करायला लावतात. बदलांपेक्षा हे स्थैर्य जास्त जवळचं आणि हवंहवंसं वाटतं मला !या स्थैर्यामुळेच बदलांना सामोरे जाण्याची उमेद मिळते ,दिलासा मिळतो !याची सतत जाणीव करून देणाऱ्या माझ्या आयुष्यातल्या constant लोकांसाठी ही कविता !त्यामागची भावना मृदू असल्यामुळे शब्दही असे आले असावेत…

कडांमध्ये डोळ्यातल्या
चांदण्या उतरल्या
वेचुनि त्या ओंजळीत मी
नभाशी उधळल्या

आठवांच्या चांदण्या या
देखण्या नभात
सुखावलं नभ सारं
भरून आलं मायेत

तुझं-माझं,माझं-तुझं
हे नभ एक आपलं
सोबतीचं क्षितीज आपण
क्षणोक्षणी जपलं

कधी ऊन कडत
कधी मोत्याचा पाऊस
तापलो,भिजलो
केली सगळीच हौस

विस्तारला आकार
झाले गहिरे रंगांनी
जिव्हाळ्याच्या वातावरणी
बहरले कैक अंगांनी

हरवण्याची आता
नसेल कधीच तमा
लुकलुक चांदण्यांत नभाच्या
तेही शोभेल बनुनि एक चंद्रमा !
                                                    

Thursday, 3 December 2015

"रेशिमधारा "

                             
                               त्या दिवशी रिमझिम पाऊस पडत होता.नेहमीप्रमाणे रात्री आभा laptop वर काम करत बसली होती.पावसाला अडवण्यासाठी तिने खिडकी बंद केली.तीन-चार वेळा जांभई आल्यावर तिने कॉफी घ्यायचं ठरवलं. गरम गरम कॉफी ओतताना नकळत नजर अंगणात बरसणाऱ्या पावसाकडे गेली.हातात मग घेऊन आभा दाराशी उभी राहिली. माळेतला एक एक मोती तुटत जावा तसे थेंब आभाळातून निखळत जमिनीजवळ येत होते. पुन्हा पुन्हा कोलांट्या मारत रुजत होते.काही प्राजक्ताच्या पाकळीवरून ओघळून गेले तर काही पानांना बिलगून अलगद विसावले. काही थेट उतरले...कोणालाही disturb न करता!सगळ्या थेंबांना मातीनं जणू उराशी कवटाळलं होतं. आणि त्या मायेचा गंध सगळीकडे पसरला होता.या पावसाचं आभाला फार कौतुक वाटलं.कॉफीच्या वाफांनी मात्र केव्हाच कंटाळून हवेत धूम ठोकली होती .आभाचं लक्षच नव्हतं. डोळे दृश्य साठवण्यात,श्वास सुगंध वेचण्यात दंग झालेले. या दोघांमुळे हृदयाचे ठोकेसुद्धा आपलं अस्तित्व दाखवत होते.बाहेरच्या जगासारखं आता आत भावविश्व भिजत चाललं होतं. त्याची ओल आभाला जाणवायला लागली. दूर कुठेतरी शून्यात बासरीचा आवाज विरत चालल्यासारखा तिला भास झाला. अंतर्मनात स्वर उमटत होते.
'रैना बीती जायेSSS ..........'
आभाने गच्च डोळे मिटले. त्या शून्यातल्या सुराच्या दिशेने तिचा आतल्या आत प्रवास सुरु झाला.मग गाणं तसंच्या तसं ऐकायला येऊ लागलं.
'श्याम ना आये'
"यातलं 'आ 'मला म्हणता आलं असतं तर किती बरं झालं असतं !"तिच्या मनात विचार आला.स्वतःजवळ येऊन पोचली तेव्हा आज दुपारी ऑफिस मध्ये झालेला संवाद आठवला.

"आपलं पटतच नसेल तर आता पुढे वाढवण्यात मला काही अर्थ वाटत नाही"
"तू समजून घे विहंग !"आभा कळवळून बोलली.
"काहीही समजायचा कंटाळा आलाय मला आता!I am fed up now!तुझे मूड्स,तुझ्या तक्रारी,तुझे explainations!मला नकोसं झालंय. माझा विचारच होत नाही आपल्यामध्ये!"
"विहंग,माझ्यावर कामाचा खूप ताण आहे !तू असा का वागतोस !"आभा चिडून म्हणाली.
"मलाही काम आहे आभा !पण मी तुझ्यासारखी नाटकं नाही करत !वेळ द्यायला जमत नसेल तर वचनं का देतेस फुकटची !"विहंगचा पारा चढला होता.
"मला नाही असं बोलता येत ,मला कळतच नाही …. "
"तुला काहीच नाही कळत!Better way ,आपण आता पुढे जायला नको !"
"तुझं पक्कं ठरलंय तर मग !"आभाने त्याच्या डोळ्यात बघत विचारलं. विहंगने नजर टाळली. समोरच दीपा बोलणं ऐकत्येय लक्षात आल्यावर विहंगने "करतो text "असं काहीबाही बोलून तेथून पलायन केलं . आभा दीपासमोर उगाच हसून निघून गेली.
                         


                         सरींचा नादमय खेळ चालूच होता.आभाच्या डोळ्यात टचकन पाणी आलं.तिने whatsapp वर विहंगचं थोड्या वेळापूर्वीचं 'last seen 'बघितलं. "कुठे केला मेसेज त्यानं मला,किती काळजी आहे ते कळतच आहे !"आभा स्वतःशी बोलून गेली.कॉफी आटोपून तिने laptop बंद केला आणि सरळ झोपायला गेली. डोळे मिटले तेव्हा 'रैना बीती जाये ' वाजत होतं. 'शाम को भूला,शाम का वादा रे … ' ! एकदा,दोनदा अगदी तसंच्या तसं तिला ऐकू आलं ."इतकं आठवतं मग म्हणता का नाही येत " तिला क्षणभर वाटून गेलं.डोळे मिटलेल्या अवस्थेत तिने हळूच गाण्याचा प्रयत्न करून पहिला.
"शाम को भूला,शाम का वादा रे....विसरलाच वादा शाम काय करायचं !hmm... पुढंचं काय बरं ? "आभा उगाच हसली.
"अगं !संग दियेके जागे है राधा !"नीता मावाशीने बरोब्बर गाऊन दाखवलं.
"अगं !मावशी !तू इतक्या रात्री जागी ?ये ना !काही हवं होतं का ?"
"नाही काही नकोय !तुझा चालू देत रियाज !"
"रियाज कसला !काहीही हा !मला कुठं येतं गाणं म्हणायला तुझ्यासारखं !"
"निंदिया ना आये ,निंदिया ना आSSSये....रैना बीती जाये" मावशीने  continue केलं .
"अहाहा !ती  'आ ' ची जागा किती सुरेख घेतेस गं !गोड गातेस खूप "
"हो ते मी गातेच !तुझी आई माझ्याहून गोड गायची !"
"हो?मग मला का नाही येत असं !"आभा खट्टू होऊन बोलली.
"कारण तुझ्या बाबांचा आवाज भसाडा category मधला होता एकंदरीत !"मावशीने हसत हसत सांगितलं.
"अरेरे !हे काही बरोबर नाही मावशी !"
"बरोबर तर बरंच काही नाहीये "मावशीने थेट नजर देत म्हटलं.
"म्हणजे ?"
"म्हणजे रात्री laptop वर कामात busy असणारी तू अशी उशीवर झोपून गाणं आठवतेस काय ,चक्क म्हणतेस काय...म्हणून म्हटलं !"
"अगं कामच करत होते… हे आपलं असंच सहज गं!"आभाने सावरून घेतलं .
" अच्छा !सगळं ठीकाय ना गं ?"
"हो !उत्तम !"
"पक्षी येत नाहीत अंगणात आजकाल !"
"त्याचं होय !अगं तसं काही नाही.ऑफिसमध्ये होते भेट आणि आता लोड आहे खूप,मग वेळ नाही मिळत!"
"मग काम झाल्यावर भेटत नाही ?थोडासा वेळ असतोच !बोलावायचं त्याला कधी कॉफी घ्यायला!पाच दहा मिनिटांनी काही फरक नाही पडत !"
"त्याला वाटलं तर तो येईल ना !तसं तो मला बोलू किंवा विचारू शकतो.तेवढं relation आहे आता आमचं !"
"त्याला कळत नाही हा मुद्दाच नाहीये !तू आपलेपणाने बोलावतेस का ?सगळ्यांना सगळं कळतच असतं आभा !पण कळत असणारे,माहित असणारे शब्दच बोलून दाखवले तर कुठं बिघडतं!"
आभा गंभीर झाली .
"या थेंबांनाच बघ !एकदा मातीवर पडले म्हणून पुन्हा ते येत नाहीत ?पुढच्या सरीमुळे ती ओल अजूनच वाढते.घट्ट रुजते खोलवर !भिजणं मातीला ठाऊक,बरसणं थेंबाना ठाऊक पण व्यक्त नाही झालं तर नात्याचा सुगंध पसरेल तो कसा ?घुसतंय ना ?"
"हो !पण हे माझ्या एकटीबाबत नाहीये !त्यानंही यायला हवंय !"
"तू हात पुढे करून तरी बघ !उशीवर गाणं म्हणून काय होणारे !"
"तू पण ना मावशी !जा आता तुला उशीर होतोय !मला खूप काम आहेत "आभा खोटं खोटं बोलली .
"अच्छा !करा ,करा काम !महत्वाची आधी करा हो !"मावशी हसत निघून गेली.

                          आभाने लगेच phone हातात घेतला. विहंगची chat window open च होती . तिने type करायला सुरुवात केली तेवढ्यातच विहंगचा मेसेज आला.
"आभा ,sorry !"
"एक शब्द बोलू नकोस ,फक्त ऐक !तू मला हवा आहेस विहंग !माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर ........! "
आणि मग त्या रात्री बराच "पाऊस" झाला ! ;)

                                                                                               -इतिश्रुती 

Saturday, 28 November 2015

"मी"

                          विचारांच्या त्याच त्याच वादळात गुरफटताना बऱ्याचदा आपण स्वतःला विसरतो.. भटकत राहतो कुठल्यातरी दूर..अनोळखी वाटेवर..आणि हिंडता हिंडता अचानक उभं ठाकतं ,एक अनपेक्षित वळण!जिथे नुकतीच चालून आलेली वाटसुद्धा परकी वाटायला लागते...कारण वळणावर सापडलेला असतो,तो हरवलेला "मी"! स्वतः हरवत जाताना स्वतःलाच शोधायला प्रवृत्त करणारं असं वळण आयुष्यात कधीतरीच येतं; पण जेव्हा येतं तेव्हा माणूस सगळ्या सुख-दुःखाच्या पलीकडे गेलेला असतो.हा सगळा अद्भुत आणि सुंदर प्रवास..आपल्या घडणीचा !त्या भावनेला शब्दात मांडण्याचा एक छोटा प्रयत्न !
                            इतका वेळ घट्ट मूठ आवळून बसलेले हात आपोआप सैल झाले…
                            सहज हलले ,मागे-पुढे ,पुढे-मागे !
                            पावले उगाच तिरपी तिरपी पडू लागली…
                            बांधलेल्या केसांना सोडवलं ;तेव्हा मोकळं झालं रान…वाऱ्याला !
                            त्याने चांगलंच खेळून घेतलं !
                            मग ओठांवरलं इवलं हासू पसरत गेलं गालावर..पार डोळे मिटेपर्यंत !
                            सुटीवर गेलेले शब्द रुजू झाले ओठांवर,
                            नवी नवी मी
                            खरी खुरी मी
                            जुनीच होते
                            जरी तरी मी
                            गंध मंद मी
                            धुंद छंद मी
                            उधळून ल्याले
                            रंग रंग मी
                            ते तरंग
                            पण मी अभंग
                            अशी स्वतःत झाले
                            दंग दंग मी
                            आता हरण्याला
                            जिंकलेच मी
                            रडगाणे थुंकलेच मी
                            आनंदवस्त्र नेसले तेव्हा
                            शोभले अंग अंग मी
                            मी तेजस्वी
                            मी मनस्वी
                            मी दव इवलासा ओजस्वी
                            एक पाकळी
                            जरा जांभळी
                            मी तिजवरी उतरत
                            जशी वळली हरकत
                            एक सुराची
                            एक सुराची !!

Tuesday, 24 November 2015

"नवलाई "

                             कधीकधी असं वाटतं सगळं सोडून द्यावं !तुम्हाला कधी असं वाटलंय?सगळं! जे काही आता आहे, ते सोडून दूर कुठेतरी ( for example हिमालयात  :P ) जावं.. शांत डोळे मिटून राहावं !कोणताच ताण नको का कसली काळजी नको !नसते विचार तर नकोच नको !मैं और बस मेरी तनहाई !wow !what a feeling !रटाळ चाललेल्या आयुष्याला जराशी गती द्यावी ,नवीन असं काही करावं जे या आधी कधी केलंच नव्हतं !नव्या आनंदात ,नव्या जगात हरवून जावं आणि या जगाचा विसर पडावा !हे जग आणि ते जग वेगळं आहे म्हणजे तरी काय नेमकं !सगळीकडे problems तेच असतात,माणसं तीच असतात. पण change of place तुम्हाला वेगळ्या विचारांच्या लाटेवर तरंगायला मदत करतं . एकाच गोष्टीचे वेगवेगळे पैलू बघायला शिकवतं !आणि त्यातून मिळणाऱ्या संवेदनांवर आयुष्य बहरतं !अशाच रोजच्या तोचतोचपणाला कंटाळलेल्यांसाठी  आज माझी अतिशय बालिश कविता !Actually आहे ते सगळं सोडून देऊ हा विचारच मुळात इतका बालिश आहे; मग शब्दांनी त्याच्याशी बालिशपणेच मैत्री करायला हवी नाही का ? :)

असे वाटते मला कधी
वारा सोसाट्याचा यावा
फेकुनी मजला दूरवर
मगच त्याने विसावा घ्यावा

ताऱ्यांनी त्या माथ्याभोवती
गरगरत मला जागे करावे
नव्या जगाचे नवे दरवाजे
दाखवत नभी पसार व्हावे

दारामागाचे गजबच नजारे
नेहमीचे त्यात 'ने' ही नसावे
नवीन वारे नवीन सारे
नव्या मलाही नवे पंख फुटावेत

उडत नव्या पंखांसमावेत
वाऱ्याशी मग पैज लढावी
दटावण्यास येता कोणी
बत्तीशी वेडावत दाखवावी

फांदीवरल्या पक्षासंगे
माझी अगदी गट्टी जमावी
हिंडत रस्ता भर रानामध्ये
आकाशातून  कशी सर पडावी

चिंब होऊन सड्यामध्ये
सारे कसे गंधून जावे
नव्या रसिक श्वासांनी मग
मन माझे तरळून जावे

मनातल्या भावनांचा एकेक
शब्द्पुष्प रचला जावा
गुंफत त्यास दोरीत सुराच्या
पक्ष्याने वाजवावा पावा

अशा गाण्याच्या तालावर वेड्या
मी बेभान नाचत रहावे
बागडून मनसोक्त थकून
मग डोळे मिटून निजून जावे !!