अशाच एका रात्री जेव्हा
व्यापाची खिचडी पोटात जाते
पाणी पिऊन ढेकर देऊन
मी मापाच्या अंथरुणात पडून राहते
अशाच एका रात्री जेव्हा
गजर लावायचे नसतात उद्याचे
सताड पापण्यांसमवेत माझ्या
टिकटिक,गरगर आवाज गूढ छताचे
अशाच एका रात्री जेव्हा
फितूर कवडसा खिडकीतून डोकावतो
ओठांवर बोट ठेवीत
दुधाळ गुपित सांगून जातो
अशाच एका रात्री जेव्हा
गुपितावर मन भाळतं
रात्र रंगवण्याचं वेडं वेड
खिडकीच्या गजापर्यंत धावतं
अशाच एका रात्री जेव्हा
जांभई कशी तत्पर येते
आठवण मला स्वप्नपटाची
हळूच शहाणी करून जाते
अशाच एका रात्री जेव्हा
मी फितुरासंगे पळू पाहते
चिकटवलेले चांदणे बघत
मीच पापण्या ओढून घेते
अशाच एका रात्री ....
No comments:
Post a Comment