रात्री बूट न काढताच झोपी गेलो . स्वप्नातसुद्धा घड्याळ वाजत होतं. टिक टाक टिक टाक….!दोन - तीन वेळा दचकून जागा झालो. वाटलं उठून जरा फिरून यावं . पण म्हटलं नको !उद्या जाग नाही यायची... मुकाट्यानं झोपी गेलो. सकाळी वेळेत हजार झालो .बॉस घाई घाईत माझी जुनी फ़ाईल चाळत होता. त्याच्या कपाळावरच्या आठ्या आणि माझ्या कपाळावरचा घाम थेट प्रमाणात वाढत होता.
"मि . अभ्यंकर !"
"येस सर …. "
"तुम्हाला उद्या लेखी कळवतो "
"ओके सर …. "मी म्हणायच्या आत तो निघून गेला .
दिवसभराचं काम कसं बसं आटोपून संध्याकाळी बागेत पोचलो. तिथे रागिणी घुस्श्यातच उभी होती. तिला बघून माझी टरकली.
"आजसुद्धा उशीर !"
"अगं…. "
आता हिला काय सांगायचं !
"काम वाढलं ग आज "
"नेहमीचंच आहे हे आता आणि lmnopqrs …xyz ! "
तिची वटवट चालूच राहिली . तिला सोडलं आणि सरळ घरी यायला निघालो. थंडी वाढली होती. कानाला बांधायला हवं होतं काहीतरी.. पण लक्षातच आलं नाही !सध्या माझ्या सोबत फक्त माझ्या बाईकचा आवाज आहे असं वाटून गेलं !लहानपणी ब्रूम ब्रूम पीप पीप करताना किती भारी वाटायचं !आता बाइक बोर झालीये. कधी बदललो मी…कधी ?काहीच आठवत नाहीये. हेच होते ते दिवस…असाच जगत होतो मी …पण मागे वळून बघतो तर…इतकं wierd का दिसतंय !असं वाटलं त्या पुलावरून जाताना ओरडत सुटावं !नाहीतर कुठे तरी डोंगरावर जाउन झोकून द्यावं !पडलो तर पडलो !नको… अर्धवट लागलं तर मलाच रडत यावं लागेल.नाहीतर कानात बोटे घालून अगदी सुईई आवाज येईपर्यंत डोळे मिटून शांत बसावं … मी बाईक कॉर्नरला थांबवली. टाय सैल केला आणि चप्पल काढून समुद्रकिनाऱ्यावर चालत राहिलो. दिवसभर फेसाळून थकलेल्या लाटा आणि मी !शांत…थंड…एकांत ! बाबा म्हणायचे ते गाणं आठवलं , "अकेला हुं मै ,इस दुनियामें ... कोई साथी है तो मेरा साया...अकेला हुं मै!......
तरी असंच आवडत होतं मला ! चालताना समोर अचानक एक फुगेवाला आला. फुगेवाला कसला.. पोरगं होतं बारकं !काळाकुट्ट चमनगोटा,त्यावर मळकट रुमाल.. एकदम भाईसारखा बांधलेला…अर्धवट फाटलेली बाही; तिही स्टाईल मध्ये दुमडलेली…खाकी हाफ चड्डी…मधून मधून फुर फुर बाहेर येणारा शेंबूड पोराची तारांबळ उडवत होता. डोळ्यात निरागसता दिसत होती. मला म्हणाला ,
"फुगा घ्या की ओ "
त्याने एकदा फुर केलं.
मी हसलो. आता त्याचे फुगे मी कुठं नेणार !
"नको बाबा !मी काय करणार यांचं ! "
कसलासा लूक देऊन पळाला .
'भारी होता तो !' मला वाटलं . माझ्या सहाव्या वाढदिवसाला किती फुगे आणले होते आजोबांनी ! फुगा फुगवायला फार आवडायचं मला !पार थोबाड सुजेपर्यंत चालू असायचं !रंगेबेरंगी फुगा आधी एका चिमटीत घ्यायचा, मग दुसऱ्या चिमटीने लांब ओढून ओठांशी न्यायचा.. गालांचे फुगे करून फ़ू SS हवा सोडायची .. हळूहळू..तिरक्या डोळ्यांनी खाली बघत अंदाज घ्यायचा आणि विचारायचं , "एवढा ?ठीक आहे ना ?" होकार आला की त्याच्या तोंडाला गाठ बांधून केलेला सगळा आटापिटा तळहाताने उडवून लावायचा ! आणि मग दुसरा फुगा…
कधी भिंतीवर सजवायचे कधी नुसतेच सोडून द्यायचे …'मी फुगवलाय हा फुगा' असं मित्रांना दाखवताना कसलं भारी वाटायचं ! आजोबा गेल्यापासून मला काय आवडतं विचारणारं कोणी राहिलंच नाही…
काय विचार करतोय मी हा ! माझं मलाच हसू आलं ! भरकटलोय… भरकटलोय…मी …. !
बाईक स्टार्ट केली तेव्हा ते शेंबड पोरगं लहान बहिणीला सोबत ओढत नेत फुगे विकत होतं. सगळे नाही म्हणायचे तेव्हा हिरमुसून बसायचं बिचारं !त्याला जवळ बोलावलं,
"ओय छोटू ! "
"दादा आज कोणीच घेतले नाहीत माझे फुगे !"
"ऐक ,आण इकडे ते सगळे "
"खरंच….?"त्याचे मोठ्ठाले डोळे अजून मोठे करत त्याने म्हटलं.
त्याने आनंदाने सगळे फुगे माझ्या हवाली केले तेव्हा त्याची बारकी त्याच्या कानात काहीतरी पुटपुटली. तो तिला गप्प बसायची खूण करत पैसे मोजत होता.कसली गोड होती त्याची स्माईल !रस्त्यावरून चक्क गाडीला फुगे बांधून मी जात होतो…ब्रूम ब्रूम पीप पीप करत!
झोपताना मी गात होतो..
'तू भीड ,बिंदास !
बोले तो एकदम झकास…
चिल मार ,फुल मार
जरा हवा येऊ दे… थंडगार!
टेन्शन साला फालतू है
तू तो मर्सिडिज,
कायको बनता ऑल्टो है ?
लेके देख एक जिंदा श्वास !
एकदम खास
आता बास..
तू भीड…बिंदास !'

Khupch mst.☺
ReplyDeleteमस्त लिहलंयस गं!!
ReplyDeletethank you
Deletenice one ..स्वतःचा ब्लॉग सोडून दुसऱ्यांचे देखील चांगले असतात हे कळलं आज 😉😃😃😃
ReplyDeleteNice
ReplyDelete