Monday, 25 July 2016

"नको ते"

लाख वाटले व्हावे हवे ते
पण होत नको तेच आहे

त्यांनी गिळून पचवला म्हणे अपमान
मी मनस्ताप व्यर्थ ओकतेच आहे

तोलला गेला तराजूत माझा खरेपणासुद्धा
खोटेपणाला त्यांच्या मात्र माप झुकतेच आहे

केला विपर्यास मी हातमिळवणीचा एकदा
टाळी एका हाताची अजून मी ऐकतेच आहे

हो, भरला असेल माझा त्यांच्यामताचा घडा
तरी काठाशी हे चार उसासे मी टाकतेच आहे

नका मांडू माझ्यापुढे लांबलचक पदावल्यांना
बेरीज साधी दोन आकडी अजून मी चुकतेच आहे ... 

"अशाच एका रात्री"

अशाच एका रात्री जेव्हा 
व्यापाची खिचडी पोटात जाते 
पाणी पिऊन ढेकर देऊन 
मी मापाच्या अंथरुणात पडून राहते 

अशाच एका रात्री जेव्हा 
गजर लावायचे नसतात उद्याचे 
सताड पापण्यांसमवेत माझ्या 
टिकटिक,गरगर आवाज गूढ छताचे

अशाच एका रात्री जेव्हा 
फितूर कवडसा खिडकीतून डोकावतो 
ओठांवर बोट ठेवीत 
दुधाळ गुपित सांगून जातो 

अशाच एका रात्री जेव्हा 
गुपितावर मन भाळतं 
रात्र रंगवण्याचं वेडं वेड
खिडकीच्या गजापर्यंत धावतं 

अशाच एका रात्री जेव्हा 
जांभई कशी तत्पर येते 
आठवण मला स्वप्नपटाची 
हळूच शहाणी करून जाते 

अशाच एका रात्री जेव्हा 
मी फितुरासंगे पळू पाहते 
चिकटवलेले चांदणे बघत 
मीच पापण्या ओढून घेते 

अशाच एका रात्री ....  

Wednesday, 13 July 2016

"पाऊस अन काय ...!"

                                   
                                     आळसावलेली सकाळ,रिपरिप कोसळणारा पाऊस त्यात सोमवार ! मळभ आकाशाला तसं मनावरही.असल्या थंडीत पांघरूण सोडवत नव्हतं. पण उठणं भाग होतं.जुनी छत्री काढली आणि निघाले. तिचं बिचारीचं आता वय होत आलेलं. तशी बऱ्यापैकी कामचलाऊ होती.एका हातात छत्री आणि एका  हातात बॉटल सांभाळत चप्पल घालायच्या प्रयत्नात तोल जाऊन समोरच्या बटणांवर डोकं आदळलं तेव्हा रूमच्या सगळ्या लाईट्स लागल्या. मग तसंच पुन्हा आदळून बंद केल्या.असो !कडेकडेने चालत होते तरी एका गाडीने चिखलाचा फवारा उडवलाच ! तुझ्या तर... म्हणेपर्यंत गाडी नाहीशी झालेली .रिक्षेतून उतरताना फोनने चिखलात उडी मारली आणि त्याच्या बॅटरी आणि बॉडीचा तिथेच घटस्फोट झाला.त्यांना कसंबसं बॅगेत भरती केलं अन स्टेशनसाठीच्या बसची वाट बघत उभी राहिले. एवढ्यात बस येण्याची काही चिन्ह नव्हती .मग पुन्हा रिक्षेकडे वळले.
"तीस रुपये होतील मॅडम " अतिशय भोळसट चेहऱ्याच्या रिक्षावाल्याने सांगितलं.
"येडे समजता का हो तुम्ही ?" माझ्या या वाक्याने त्याचा चेहरा पडला आणि निमूट वीस रुपये घेण्याचं कबूल करवून निघाले.मी कडेला बसलेली.शेजारी दाटीवाटीत बसवलेली लोकं. त्यांना कुठे बघत बसू ! बाहेर बघताना जाणवलं ,खरंच आज खूपच पाऊस पडतोय .म्हणजे फार दिवसांपासून चालू होता तसा ,पण इतका आजच पडला. पुण्याचा पाऊस खूप बोर वाटतो मला. एकसारख्याच सरी, तशाच स्टाईलमध्ये. एकाच इयत्तेतल्या विद्यार्थ्यांसारख्या. बऱ्याचदा हा पाऊस न भिजवणाराच असतो.एकदम मेडीओकर.पावसावर बेधुंद होऊन प्रेमबीम करावं असं काही (म्हणजे हड..! )वाटत नव्हतं.एक तर एवढ्या छान झोपेचा त्याग करून धडपड करत आले,त्यात फोन खराब झाला. आजूबाजूला चिकचिक, रिक्षावाल्याचे मस्तवाल फवारे आणि सगळं बघत बसण्याशिवाय काही पर्याय नसलेली मी..पावसापासून स्वतःला वाचवण्यासाठी मी छत्री उघडून आडवी धरली होती . रिक्षेला दार होईल अशी . तरी सुद्धा एक ओघळ माझ्या पॅंटीवर गळत होता !चायला ह्याच्या !बोरींग बोरिंग बोरिंग !!!
                                      Whatsapp बघितलं तेव्हा सिंगल लोकांचे स्टेटस पाऊस आणि एकटेपणाच्या संदर्भातले सापडले . बऱ्याच मुलींनी wow पाऊस, मन पाऊस वगैरे लिहलेलं. त्यांच्या एवढ्या रसिकतेचं कौतुक वगैरे वाटून गेलं. मीही कधी या पावसावर कविता केली होती यावर माझा विश्वास बसत नव्हता. पॅन्टवर उडालेला चिखल दिसला तेव्हा असा राग आला पावसाचा! खरंच पावसाला काही manners च नसतात! मनाला येईल तसं वागतो! कधी मुसळधार, कधी नुसत्या बारीक थेंबांचा खेळ. बेशिस्त अगदी! सगळं नॉर्मल चालू असताना अशी पंचाईत करतो की बस ! मी कधीची भुवया आवळत बोटं मोडत बसलेली. पाऊस नावाची कोणी व्यक्ती वगैरे असती तर समोर उभी करून चांगलं दोन-चार सुनावता तरी आलं असतं !हा काय माज उगाच !शेवटी चिडून बंदच केली मी छत्री ! भिजव बुवा एकदाचा ! मग काय ,त्याच्या एकएक थेंबाची बरसात चेहऱ्यावर !कुडकुडल्यासारखं झालं. मी कधी मूठ सोडवून पाण्याशी खेळायला लागले मलाच कळलं नाही . सगळी भिजत होते मी.  मलाच वाटलं,एवढाही वाईट नाहीए हं पाऊस ...!हो ! लहाणपणी मुद्दाम पावसात भिजायला जायचो तेव्हा मजा यायची !अपार्टमेंटच्या बच्चेपार्टीला गोळा करून येतो तेवढा डान्ससुद्धा करायचो आम्ही पावसात ! डोकं पुसल्यावर आई गरम गरम भजी करायची. मक्याचं कणीस मीठ-लिंबू- तिखट लावून! पण ते सगळं घरी !अच्छा म्हणजे आपल्या situation नुसार कधी पाऊस बरा तर कधी बुरा वाटतो तर ! पण त्याला काय त्याचं ! 'Who cares' attitude साल्याचा ! भिजवलंच ! इतका धुंद कसा असू शकतो हा स्वतःमध्ये !  त्याला दूषण देणाऱ्या लोकांनासुद्धा लळा लागून जावा म्हणजे!ठरवूनसुद्धा त्याच्यावर चिडता येत नाही. न जाणे कसलं सौंदर्य आहे याच्या स्वभावात ! मी विचारात पडले.
                                      पोचले तेव्हा बऱ्यापैकी ओसरला होता. हो ! पोचल्यावर ओसरला !खिडकीतून सगळं हिरवं हिरवं दिसत होतं. थंडी होतीच. सर अजून यायचे होते.मी वहीच्या मागचं पान काढून सुरू झाले.
शब्दशब्द चिंब झाला
शहारलं कोरं पान
भावसरी बरसल्या
उमललं कवीमन...