अडगळीतली पुस्तके पाहिली आणि सारं बालपण डोळ्यासमोरून झर्झरतं गेलं. खूप आठवणी लहानपणीच्या, मनाच्या कोपऱ्यात दडलेल्या असतात ज्या एरवी आठवत नाहीत पण एकदा आठवलं की सहसा सुटका होणे नाही अशी गत. प्रत्येक पुस्तकाची एक वेगळी आठवण आणि वेगळीच गोष्ट आहे. त्या वेळच्या असंख्य क्षणांच्या सोबती. लहानपणी मी जवळजवळ सगळं केलंय. छोट्या शाळेतून असल्याचे काही फायदे म्हणता येईल. नृत्य, अभिनय, चित्र, वक्तृत्व, अवांतर परीक्षा सगळंच. पुढे जाऊन नेमकं करायचं काय याचा पेच पडण्याचं हेच कारण असावं. स्वतःचा अंश सगळीकडे थोडा थोडा दिसायचा पण स्वतः आहोत काय हे इतक्या सहज कळलं नाही. लहानपणी मजा वाटायची. मला सर्वात जास्त आवडलेला विषय कोणता हे समजलेलेच नाही मला अजूनही. पण खरोखर आवडलेली एकमेव गोष्ट आहे ती म्हणजे अजाण बालपण आणि वेडी होऊन बागडणारी मी. स्वतःमध्ये इतकी गुंग. तिला शोधायचं आहे पुन्हा.
सगळे मिळावे क्षणात सरावे
काय उरावे तुजपाशी
तूच तुझा आनंद वेड्या
काय पुसशी जगाशी
क्षुल्लक सारे दुःख बापडे
क्षुल्लक असती आनंद
प्राक्तनाचे ओझेच ते
कशास करावा नसता खेद
अलगद घ्यावे स्वतःला
उचलूनि ओंजळीत धरावे
तुझ्या असण्याचे कशाला
जगा मागावे उगा पुरावे
जपणे स्वतःला
एवढेच शिकायचे
नागड्या आनंदाने
दुःखातही बागडायचे
-इतिश्रुती
Tuesday, 2 June 2020
"बालपण"
Subscribe to:
Comments (Atom)
